Pune Metro : कोथरूडकरांना मोठा दिलासा! पौड रस्त्याची वाहतूक कोंडी संपणार, मेट्रोसाठी उभारणार दुमजली उड्डाणपूल
प्रभात वृत्तसेवा
पुणे – नळ स्टॉप आणि विद्यापीठ चौकात मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसाठी बांधलेल्या दुमजली उड्डाण पुलाप्रमाणे तिसरा उड्डाण पूल आता कोथरूडमध्ये बांधला जाणार आहे. पुणे मेट्रोकडून रामवाडी ते वनाझ मार्गिकेचा फेज २ मध्ये विस्तार केला जाणार असून, त्यानुसार वनाझ ते चांदणी चौकाच्या विस्तारात कोथरूडच्या बस डेपो चौकात हा दुमजली उड्डाण पूल बांधला जाणार आहे.या पुलाचा वरच्या भागावरून मेट्रोची मार्गिका बांधली जाईल, तर खाली रस्ते वाहतुकीसाठी उड्डाण पूल असेल.
सध्या नळ स्टॉप चौकात असलेल्या पुलामुळे कर्वे रस्त्यावरून पौड फाटा किंवा डेक्कन कॉर्नरला जाणाऱ्या वाहतुकीला लॉ कॉलेज रस्त्याने येणारी वर्दळ अडचण ठरत नाही आणि कर्वे रस्त्यावरील मोठी कोंडी टळते. त्यानंतर विद्यापीठ चौकातील उड्डाण पुलाची एक बाजू नुकतीच खुली झाल्याने या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पौड रस्त्यावर बांधण्यात येणारा हा उड्डाण पूल या चौकात होणारी कोंडी कमी करेल, तसेच मेट्रो मार्गिकेमुळेही पौड रस्त्यावरील वाहने कमी होण्यास मदत होईल.



