Ramtekdi MIDC Accident : हडपसरमध्ये काळजाचा थरकाप! क्रेनचा पट्टा तुटून सळई डोक्यात पडली; कामगार महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Ramtekdi MIDC Accident : कामाच्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी गेलेल्या वैशाली भोसले यांच्यावर काळाचा घाला; क्रेनने उचललेली सळई थेट डोक्यात पडल्याने जागीच मृत्यू.

Ramtekdi MIDC Accident – हडपसर येथील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीच्या आवारात लोखंडी जिन्याचे काम करताना क्रेनचा पट्टा तुटल्याने सळई डोक्यात पडून कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेन चालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. वैशाली मारुती भोसले (वय ४७, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत भोसले यांचा मुलगा चेतन मारुती भोसले (वय २१) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हडपसर येथील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत वैशाली भोसले काम करत होत्या. कंपनीच्या आवारात मागील बाजूस लोखंडी जिना तयार करण्याचे काम १८ फेब्रुवारीला सकाळी अकराच्या सुमारास सुरू होते. वैशाली भोसले आणि सहकारी कंपनीच्या आवारातून पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघाल्या होत्या. क्रेन चालक लोखंडी जिना तयार करण्यासाठी सळई उचलत होता. त्यावेळी अचानक क्रेनचा पट्टा तुटला.
पट्टा तुटल्यानंतर क्रेनने उचलेली सळई वैशाली यांच्या डोक्यात पडली. दुर्घटनेत वैशाली गंभीर जखमी झाल्या, त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. क्रेन चालक, ठेकेदार यांनी पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघड झाले. क्रेन चालक, ठेकेदार, तसेच संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.





