satara | शाळा आदर्श होण्यासाठी समाजाचा सहभाग आवश्यक

महाबळेश्वर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श करत असताना शासनाबरोबर समाजाचाही सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे मत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेटगुताड, ता. महाबळेश्वर येथे आयोजित आजी-माजी विद्यार्थी शैक्षणिक मेळाव्यात मार्गदर्शन करत त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पारठे,
उपअभियंता संजय जाधव, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, शाखा अभियंता संतोष गोरे, सुरेंद्र पारखे, सरपंच महादेव ओंबळे, भिकन बावळेकर, संजय बावळेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल बावळेकर, विस्तार अधिकारी सुनील चिकणे, कनिष्ठ अभियंता साधना पोरे व सुहास कुलकर्णी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
याशनी नागराजन यांनी शालेय विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत पुढे जावे तसेच अभ्यासात चिकित्सक व जिज्ञासूवृत्तीने ज्ञानग्रहण करण्याचा मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षकांनी दूरचित्रप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना महाबळेश्वर तालुक्यातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करुन शिक्षकांनीही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सध्या सुरु असलेले उपक्रम पूर्ण क्षमतेने आपापल्या शाळांमध्ये राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राधाकृपा आश्रम भोसे-भिलार यांच्यावतीने तालुक्यातील २५ शाळांना देण्यात येणारे एल.सी.डी.दूरदर्शनसंच प्रातिनिधिक स्वरुपात भाऊसाहेब दानवले यांच्यामार्फत मेटगुताड शाळेस याशनी नागराजन यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना सुपूर्द करण्यात आला.
गटविकास अधिकारी अरुण मरभळ व गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी आदर्श शाळेबाबत मार्गदर्शन करुन लोकसहभाग देण्याचे आवाहन केले..
सुनील भिलारे यांनी स्वागत केले.
रमेश सरक यांनी आभार मानले. श्रीगणेश शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर पवार, पल्लवी घोडके, वैशाली गुरव, कमल सावंत, स्वाती गावडे यांनी परिश्रम घेतले.





