पुणे जिल्हा | निर्मला गायकवाड यांना राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार

भिगवण, (वार्ताहर)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंग्रोबामाळ (ता. दौंड) शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला गोरख गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सोलापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला या निमित्ताने खानवटे येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
निर्मला गायकवाड यांनी हा पुरस्कार आजपर्यंतच्या माझ्या वाटचालीमध्ये योगदान देणार्या सर्वांना अर्पण करत असल्याचे सांगितले. आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या या सेवेचे हे यश असून भविष्य काळामध्ये ही अधिकाधिक चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कु. गायत्री गोरख गायकवाड हिने बी. ए. एम. एसची पदवी संपादन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने तिचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना गायत्री गायकवाड हिने ज्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेमध्ये होत असलेला सत्कार हा माझा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदी क्षण असल्याचे सांगत या सत्काराने आपण कृत्य कृत्य झाल्याचे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष जयश्री चव्हाण, उपाध्यक्ष सोमनाथ पतुरे यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रियांका लोखंडे, सारिका गायकवाड, प्रल्हाद यादव, चंद्रकांत गाडे, संदीप पानसरे, मयुरी यादव, रामदास चव्हाण, गणेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गायकवाड परीवाराच्यावतीने मिष्ठान्न भोजन देण्यात आले. याप्रसंगी गोरख गायकवाड, सारिका गायकवाड, मुख्याध्यापक महादेव बंडगर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना भिसे यांनी केले तर सूत्रसंचालन रणजीत बनसुडे यांनी केले.





