पुणे जिल्हा | वरचेमळा शाळेबाबत आमदार जगतापांची मध्यस्थी

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्हे जवळील वरचामळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने केलेल्या अतिक्रमणाबाबत तक्रारदाराने थेट शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्याने अखेर पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांच्या मध्यस्थीला यश आले असून बाधित कुटुंबाने शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला असल्याचे निलेश कुदळे यांनी सांगितले.
वरचामळा येथे निलेश कुदळे यांच्या खासगी मालकीच्या क्षेत्रामध्ये, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी कुदळे यांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. कुदळे यांनी याबाबत, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, स्थानिक प्रशासन, जेजुरी पोलिस ठाण्यापर्यंत अधिकारी व पदाधिकारी यांना निवेदने दिले होते. मात्र, यावेळी,त्यांना, आश्वासनेच मिळाली होती.
अखेर संतप्त झालेल्या नीलेश कुदळे यांनी मंगळवारी (दि. 28) या शाळेला टाळे ठोकण्याचा लेखी इशारा दिला होता. दरम्यान, आमदार संजय जगताप यांची दखल घेऊन सोमवार (दि.27) तातडीने सासवड येथे जागामालक, निलेश कुदळे यांची बैठक घेतली. यावेळी सुरेखा ढवळे, राजेंद्र जगताप, आतिष जगताप, शंकर भुजबळ, गुलाब जगताप आदी उपस्थित होते.
जवळपास दोन तास चर्चा
जवळपास दोन तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आमदार संजय जगताप यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांनी नीलेश कुदळे यांच्या पंचायत समितीमध्ये संयुक्त बैठक घडवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळ दि. 6 जून रोजी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या दालनात व आमदार जगताप यांच्या उपस्थितीमध्ये याबाबतची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे ठरले गेले.





