संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर रामदास कदमांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई – शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील मैत्री निवासस्थानी रविवारी सकाळी ईडीने धाड मारली. ईडीचे जवळपास १० अधिकारी राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राऊत यांच्यावर ईडी कारवाई सुरु असल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने मैत्री निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. राऊत यांच्यावर सुरु असलेली ईडी कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप हे शिवसैनिक करताना दिसत आहेत. शिवसेनेमध्ये बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटाकडून देखील याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
बंडखोर गटाचे नेते रामदास कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी ईडी कारवाईवर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देताना, बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत ही कारवाई खोटी असल्याचं म्हंटलं होत. कदम यांनी हाच धागा पकडत, राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये त्यांनी शरद पवार यांची शपथ घ्यावी असा टोला लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
राऊत हे कुणालाच घाबरत नाहीत, असं त्यांनीच वृत्तवाहिन्यानावर छाती ठोकून सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी जर कोणता अपहार केला नसेल तर घाबरण्याचे कारण काय? असे शालजोडे मारताना कदम यांनी राऊतांमुळेच शिवसेना फुटली असा आरोप केला.
संजय शिरसाट यांचाही ईडी कारवाईला पाठिंबा
संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना संजय शिरसाट यांनी, “ईडीची एवढीमोठी धाड पडते तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, महाराष्ट्राला त्रास झालाय, शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आज आनंदी आहेत, शिवसैनिक आनंदी आहेत. ते काही मास लीडर नाही, प्रवक्ते आहेत. त्यामुळे काही मोठा उठाव होईल असं वगैरे वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.





