Ram Satpute : सुपाऱ्या देऊन हत्या, पोलिसांवर हल्ले हा मोहितेंचा इतिहास; राम सातपुतेंचा गंभीर आरोप

सोलापूर : माढा तालुक्यातील कुर्डू गावातील बेकायदा मुरूम उत्खनन आणि गुंडगिरीच्या वादाने राजकीय उकस निर्माण झाली असताना, माळशीरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर थेट हल्लाबोल केला आहे. “वरिष्ठ पोलिसांना मारणे, लोकांच्या सुपाऱ्या देऊन हत्या घडवून आणणे, गोरगरीब आणि राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, जमिनी बळकावणे हा यांचा इतिहास आहे,” असा घणाघाती आरोप सातपुते यांनी केला.
ते सोलापूर येथे बोलत होते. कुर्डूच्या माजी सरपंच अण्णा ढाणे यांनीही मोहिते पाटलांना ‘अकलूजचा वाल्मीक कराड’ म्हणत १६ हत्यांमध्ये सहभाग असल्याचे आरोप केले असून, सातपुते यांनी यात ‘१०० टक्के सत्य’ असल्याचे पुष्टीकरण केले.
कुर्डू गावात बीडसारखी परिस्थिती असल्याचे मोहिते पाटलांनी म्हटल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. यानंतर माजी सरपंचांनी मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये सुपारी देऊन मित्राचा खून केल्याचा उल्लेख आहे. सातपुते यांनी अकलूजमधील ‘खूनांची मालिका’ नमूद करत म्हटले, “अकलूजचा आका कोण? या गुन्हेगारी प्रवृत्तीची CBI चौकशी व्हावी.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून मागणी करणार आहे. ही विकृती आहे. दारू पिऊन गाडी चालवली म्हणून पोलिसांनी हटकल्यावर वरिष्ठ पोलिसांना मारणारे हे आहेत. आज यांना पोलिसांचा पुळका आला? भाजप अशा गुंडांची दहशत मोडून काढेल.”
या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवर धमकावून कुर्डूतील बेकायदा मुरूम कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणही जोडले गेले. मोहिते पाटलांनी मात्र प्रत्युत्तर देत म्हटले, “आरोप करणाऱ्यांना कायदेशीर भाषेत उत्तर मिळेल. मी केलेले आरोप पुराव्यानिशी आहेत. सरकारी जमिनीवरील बेकायदा मुरूम उपसा, गुंडगिरी आणि अधिकाऱ्यांना धमकावणे, मारहाण करणे याचे दाखले दिले. पुण्यातील अशा आरोपींना पोलिस अटक का करत नाहीत?”





