Ram Satpute : …तर भर चौकात नागडा करून मारू, राम सातपुतेंची मोहिते पाटलांवर टीका

सोलापूर : मागच्या काही दिवसांपासून सोलापूरमधील मारकडवाडी गाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ८ डिसेंबर रोजी शरद पवारांनी सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडीला भेट दिली होती. त्यांनी स्थानिक नागरिकांनी ईव्हीएम विरोधी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसेच त्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल देखील केला होता. त्यांच्या या टीकेला आता महायुतीनं शक्तीप्रदर्शन करत मविआवर पलटवार केला.
यावेळी राम सातपुते यांनी आक्रमक भाषण करत मोहिते पाटलांना थेट तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर धमक्या देणाऱ्यांना भर चौकात नागडं करून मारू अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली. त्यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील या तिघांवर विखारी भाषेत टीका केली आहे.
राम सातपुते आपल्या भाषणात नेमके काय म्हणाले?
“अकलूज नगर परिषदेचा नगराध्यक्ष भाजपचा असेल, शेतकऱ्यांना लुटणारा शंकर सहकारी साखर कारखान्यावर येत्या ६-७ महिन्यात प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही. यशवंत सहकारी साखर कारखान्यावर देखील चौकशी लावू. माळशिरस तालुक्याची जी लूटमार केली. माळशिरस तालुक्यातल्या गोर गरीब, सामान्य शेतकऱ्यांचे आणि वंचित घटकांचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले. ती बँक मोहिते पाटलांनी लुटली.
या स्टेजवरून मी मारुतीच्या साक्षीने सांगतो की, ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली, त्याला वर्षाच्या तुरुंगात नाही टाकलं, तर नावाचा राम सातपुते नाही. ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट बँक बुडवून खाल्ली, त्या मोहिते पाटलांना तुरुंगात टाकलं नाही, तर राम सातपुते नाव लावणार नाही.” असे राम सातपुते म्हणाले आहेत.
तसेच निवडणुकीत ज्यांनी विरोधात काम केले आणि आता भाजप नेत्याचे पाय धरत आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील थोडी जरी लाज शिल्लक असेल तरी राजीनामा द्या. गद्दारांना माफी नको हे फडणवीस साहेबांना सांगा असे राम सातपुते म्हणाले.
मोहिते पाटलांवर जोरदार टीका
रविवारी शरद पवारांच्या सभेदिवशी शरद पवार गट आणि भाजपचे काही कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावर राम सातपुते म्हणाले “मोहिते पाटलांच्या चमच्यांना सांगतो, व्हॉट्सॲपवर काहीही शेअर करणं बंद करा. राम सातपुते अशा गोष्टींना घाबरत नाही. राम सातपुते चांगल्या चांगल्यांना घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही.
आमच्या कार्यकर्त्याला मारलं, आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर आम्ही धमकी देणाऱ्याला नाही, तर धमकी द्यायला लावणाऱ्याला भर चौकात नागडा करून मारू, ही धमकी समजायची असेल तर धमकी समजा. राम सातपुते लेचापेचा कार्यकर्ता नाही,” त्यामुळे आता मोहिते पाटील त्यांच्या या टीकेला काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





