Sharad Pawar : ‘असली बारकी-चिरकी उंदीरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात’; पडळकरांच्या ‘त्या’ टीकेला राष्ट्रवादीचं जोरदार प्रत्युत्तर

Sharad Pawar : ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे. हे गाव सध्या राजकीय घडमोडींचं केंद्र बनलं आहे. मॉक पोलिंगचा निर्णय घेतल्यानंतर हे गाव चर्चेत आलं. या गावात शरद पवार गेले होते. त्यानंतर आज महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली. यावेळी भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. तसेच जयंत पाटील, रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, पडळकरांच्या या टीकेला आता शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. माळशिरसचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “असली बारकी- चिरकी 5 उंदीरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात. त्याच्या मागे कोण सगळ्यांना माहिती आहे. अशी बारीक उंदरे जाऊन तिथं पवारसाहेबांवर टीका करतात.
बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने काय फरक पडत नाही. कावळ्याच्या शापाने गुर मरत नाहीत. पवार साहेब पवार साहेब आहेत. त्यांनी भल्याभल्यांना लोळवलं आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोपर्यंत मारकडवाडीमधील आंदोलन सुरूच राहील, असं म्हणत उत्तमराव जानकर म्हणाले.
राम सातपुतेंवर निशाणा
राम सातपुतेंनी माझ्यासोबत यावं. 2029 कशाला गुलाल उधळायला मी महिना भरात संधी देतो. मंत्री होईल राज्यात त्यांचे सरकार आहे. मरतोय जगतोय 2029 फार लांब… असे 100 राम सातपुते मोहिते पाटलांचे बुट पुसायला असतात. त्याने काय बऱळावं.. त्याचा तो स्तर आहे. तो वैफल्यग्रस्त आहे. तो मेंटल हॉस्पिटलमध्ये होता, असं म्हणत जानकरांनी राम सातपुतेंवर निशाणा साधला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले…
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “ईव्हीएमला विरोधी करून बॅलेट पेपेरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की. शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे.
तसेच काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार यांचे सर्व राजकारण विश्वासघातावर अवलंबून होते. त्यांची अक्कल देखील या आंदोलनात संपल्याचे दिसते. 2017 ते 2024 पर्यंत एकानेही मशीनमध्ये कसा घोटाळा होतो ते दाखवू शकले नाहीत. जयंत पाटील यांनी हे सिद्ध केले तर लायकी नुसार 101 रुपयाचे बक्षीस आणि दुसऱ्या कोणीही हॅक करून दाखवल्यास 11 लाखाचे बक्षीस देऊ असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.
राम सातपुते नेमके काय म्हणाले?
“अकलूज नगर परिषदेचा नगराध्यक्ष भाजपचा असेल, शेतकऱ्यांना लुटणारा शंकर सहकारी साखर कारखान्यावर येत्या ६-७ महिन्यात प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही. यशवंत सहकारी साखर कारखान्यावर देखील चौकशी लावू. माळशिरस तालुक्याची जी लूटमार केली. माळशिरस तालुक्यातल्या गोर गरीब, सामान्य शेतकऱ्यांचे आणि वंचित घटकांचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले. ती बँक मोहिते पाटलांनी लुटली.
या स्टेजवरून मी मारुतीच्या साक्षीने सांगतो की, ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक बुडवून खाल्ली, त्याला वर्षाच्या तुरुंगात नाही टाकलं, तर नावाचा राम सातपुते नाही. ज्या मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट बँक बुडवून खाल्ली, त्या मोहिते पाटलांना तुरुंगात टाकलं नाही, तर राम सातपुते नाव लावणार नाही.” असे राम सातपुते म्हणाले आहेत.
तसेच निवडणुकीत ज्यांनी विरोधात काम केले आणि आता भाजप नेत्याचे पाय धरत आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील थोडी जरी लाज शिल्लक असेल तरी राजीनामा द्या. गद्दारांना माफी नको हे फडणवीस साहेबांना सांगा असे राम सातपुते म्हणाले.





