Ram Satpute : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने राज्यभरात दमदार कामगिरी केली असून सोलापूर जिल्ह्यातही पक्षाने दैदीप्यमान विजय मिळवला आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात विजय मिळवला असला, तरी सातारा जिल्ह्यात त्यांच्या कुटुंबीयांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या निकालावर भाष्य करताना मंत्री गोरे यांनी धक्कादायक आरोप केला. “माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यांच्या हत्येचा कट रचला गेला होता,” असा गंभीर दावा त्यांनी केला. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास सुरू असून, कट कोणी रचला याचा खुलासा तपासानंतर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर ‘गुंड’ अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना गोरे म्हणाले, “जे मला गुंड म्हणत आहेत, तेच खरे गुंड आहेत. माळशिरसमध्ये निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, मारहाण आणि दमदाटी करण्यात आली. भाजपला मिळालेला प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले.” साताऱ्यातील पराभवावर भाष्य सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत भाऊ आणि वहिनींच्या पराभवावर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, “पराभवाची कारणे सांगण्याची मला सवय नाही. झालेला पराभव मी स्वीकारतो. सोलापूरकडे अधिक लक्ष असल्याने साताऱ्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले, हे मान्य आहे. मात्र केवळ दुर्लक्ष हेच पराभवाचे एकमेव कारण नाही.” “राजकारणात पराभव आणि विजय येतच असतात. मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला सांगितले आहे की पराभव अंतिम नसतो आणि विजयही अंतिम नसतो. महत्त्वाचे म्हणजे आपल्या कामात सातत्य असले पाहिजे,” असेही गोरे म्हणाले. बारामती विमान अपघाताच्या चौकशीची मागणी अजित पवार यांच्याशी संबंधित बारामती विमान अपघाताच्या चौकशीवर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, “या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, हे आमचेही मत आहे. चौकशी सुरू असून विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. कोणती एजन्सी चौकशी करणार, याचा निर्णय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य-केंद्र सरकार घेतील.” भाजपमधील अंतर्गत राजकारणावर भाष्य भाजपमधील अंतर्गत मतभेदांवरही त्यांनी भाष्य केले. “भाजपचे यश काही लोकांना पचत नाही. पक्ष व्यक्तींमुळे नाही, तर संघटन आणि केडरमुळे जिंकतो. जयकुमार गोरे किंवा अन्य कोणामुळे भाजप जिंकलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. “पालकमंत्री अपयशी ठरल्यास पुढे काय करायचे, कोणाला सोबत घ्यायचे, याचेही काही जणांनी नियोजन केले होते. पक्ष आणि नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मात्र भाजपचे कार्यकर्ते आणि जनतेने कोणत्याही आमिषाला बळी न पडता आमच्यामागे ठामपणे उभे राहिले,” असे म्हणत गोरे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.