Ram Navami 2026 – भोर संस्थानच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली राजदरबारात पंतसचिवांचे कुलदैवत असलेल्या प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा गुरुवारी (दि. २६) पारंपरिकपणे थाटात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता सनई, तुतारी आणि संबळाच्या निनादात श्री रामाच्या जयघोषाने संपूर्ण राजवाडा दणाणून गेला होता. सुमारे ३२५ वर्षांची ही ऐतिहासिक परंपरा आजही तितक्याच भक्तीभावाने जपली जात आहे. सकाळी ११ वाजता राजघराण्यातील वंशज राजेशराजे चिंतामणराव पंतसचिव, सौ. स्वातीराजे, योगेश, पार्थराजे, युवराज पार्थराज, सौ. नीताराजे, राजकुमारी ईशाराजे, निमिसाराजे, योगेशराजे यांच्यासह राजघराण्यातील इतर सदस्यांनी पळशीकर यांच्याकडून राममूर्ती पालखीतून मिरवणुकीने राजदरबारात आणली. यावेळी वाटेत नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. दरबारात सजवलेल्या पाळण्यात मूर्ती ठेवून राम आख्यायिकेला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता राजेशराजे पंतसचिव व त्यांच्या भावाने व मुलाने पाळण्याची दोरी ओढुन श्री रामाचा जयजयकार केला. विजय दुसंगे, मधुकर पैठणकर, वैशाली पुतणीस , शिवाजी तामकर यांनी भजन व रामाचा पाळणा गायला. जन्मोत्सवानंतर उपस्थित हजारो भाविकांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले. भोरचे संस्थानिक पंतसचिवांचे कुलदैवत असल्यामुळे १७२० साला पासुन हा रामजन्मोत्सव व सचिवपदाचे संस्थापक शंकरजी नारायण यांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव हे दोन्ही उत्सव साजरे केले जातात. या निमित्ताने भोर शहरात व्यापाऱ्यांनी कमानी उभारल्या होत्या, तर राजवाडा परिसरात खेळणी व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. राजबागेत रामनवमी व श्री जानाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडाही भरवण्यात आला होता. या सोहळ्याला भोरचे तहसिलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक आण्णा पवार, भूमी अभिलेख अधिकारी हेंमत निगडे, प्रमोद फडणीस, शंकर गव्हाणे, सचिन मांडके, भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, डाॅ. आण्णा बिराजदार, सुधीर खाटपे, जगदिश किरवे, समीर घोडेकर, लक्ष्मण भांगे, केशव पवळे, सोमनाथ कुंभार तसेच इतर शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जेधे वाड्यातही जन्मोत्सव साजरा भोरपासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या कारी येथील ऐतिहासिक सरदार कान्होजी जेधे वाड्यातही पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी जेधे यांचे १४ वे वंशज रणधीर जेधे, युवराज जेधे, इंद्रजीत जेधे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच भोरमधील आमराई आळी चैतन्य सेवा मंडळाच्या वतीने आणि गोल्डन मित्र मंडळाने दत्त मंदिरातही जन्मोत्सव उत्साहात साजरा केला.