पुणे : श्री रामजी संस्थान तुळशीबागच्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात दि. ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त आणि पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, रामायण प्रवचन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यासह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी १७६१ मध्ये स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा होणार असून उत्सवाचे २६४ वे वर्ष आहे. गुढीपाडव्याला रविवारी (दि.३०) श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ होणार आहे. दि. ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ९:०० वाजता श्री गणेश्वर शास्त्री पारखी हे रामायण वाचन, दुपारी १२:०० वाजता श्रीरामांची महापूजा व आरती, सायंकाळी ७:३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक आणि आरती महापूजा होणार आहे. दररोज सायंकाळी ५:३० वाजता ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांचे श्रीमत् रामायण प्रवचन होणार आहे.