‘कॉंग्रेसचे सरकार असते तरी राम मंदिर झाले असते..’; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचा सर्वात मोठा दावा

Ram Mandir । Ashok Gehlot – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार असल्यामुळे भव्य राम मंदिराची निर्मिती होऊ शकली असे भारतीय जनता पार्टीचे म्हणणे आहे.
तर समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसवाले जर सरकारमध्ये आले तर राम मंदिरावर बुलडोझर चालवला जाईल असा गंभीर आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर प्रदेशातील सभेत केला. त्यांच्या या दाव्याला राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी उत्तर दिले आहे.
राम मंदिराचे बांधकाम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झाले आहे. जर केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीच्या ऐवजी यूपीएचे सरकार असते तरी मंदिर झाले असते. भारतीय जनता पार्टीऐवजी कॉंग्रेसचे सरकार असते तरी ते झाले असते.
भाजपडून विनाकारण संभ्रम निर्माण केला जातो आहे. निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात हे जनतेला समजले आहे असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या विषयावर टिप्पणी केली होती. समाजवादी पक्ष, कॉंग्रेस आणि पाकिस्तान हे भारत, भारतीयता आणि मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाच्या विरोधात आहेत असा आरोप करतानाच इंडिया आघाडीचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिमांना ओबीसींचे आरक्षण देण्याची वकिली केली असल्याचा दावा योगींनी केला आहे.





