येत्या 26 जूनला राजू शेट्टी काढणार कैफियत यात्रा; राज्य सरकारवर साधला निशाणा

Swabhimani Shetkari Sanghatana Kaifiyat Yatra | महाविकास आघाडीच्यावतीने कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आली. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. त्यामुळे नागपूर ते गोवा शक्तीपीठ हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
शुक्रवारी 21 जून रोजी माध्यमांशी बोलताना राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती निमित्त शेतकऱ्यांची कैफियत पदयात्रा काढणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी राज्य सरकारवही निशाणा साधला. मागील वर्षे तुटलेल्या ऊसामधून मिळालेल्या फायद्यातून शेतकऱ्यांना किमान 100 रुपये प्रति टन मिळावेत ही मागणी होती.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी हमी देखील दिली होती. आश्वासन पाळणे हे सरकार जबाबदारी होती. परंतु आमच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली. सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
कैफियत पदयात्रा काढणार
“शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. आता विधानसभेच्या तोंडावर अडचण येईल म्हणून महामार्गाचे भूसंपादन थांबवलं असं सांगतात. मात्र आम्हाला ही स्थगिती नको तर रद्द करण्याची आमची मागणी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्याच जिल्ह्यात आज शेतकरी भूमिहीन होऊ लागला आहे. आता आम्ही राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती निमित्त शेतकऱ्यांची कैफियत पदयात्रा काढणार असून २६ जूनला दीडशे शेतकरी घेऊन ही पदयात्रा काढली जाणार आहे,” असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. सध्या जो महामार्ग आहे तो तोट्यात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द देतात मात्र नंतर सोयीस्करपणे तो विसरतात. सरकारला शाहू महाराजांनी सुबुद्धी द्यावी, यासाठी आम्ही ही पदयात्रा काढणार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:





