Indapur News : इंदापूरच्या ऊस आंदोलनाचा निकाल! राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांसह २१ जण निर्दोष मुक्त
Indapur News : २०१२ मधील ऊस दराच्या संघर्षाला अखेर पूर्णविराम; इंदापूर न्यायालयात राजू शेट्टी आणि सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता.

Indapur News – २०१२ साली ऊस दरवाढीचा प्रश्न चिघळल्याने इंदापूर येथे शेतक-यांचे तीव्र आंदोलन झाले होते. या आंदोलनात माजी खा. राजू शेट्टी यांच्यासह माजी मंत्री सदाभाऊ खोत, सतिश काकडे, निलेश देवकर यांच्यासह २१ आंदोलकांवर एकुण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या ८ गुन्ह्यापैकी ३ गुन्ह्यातून या आंदोलकांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.
२७०० रूपये पहिली उचल देण्याची मागणी करत शेतक-यांनी आंदोलन छेडले होते. राज्यातील साखर कारखानदारापैकी कोणीच दर जाहीर केले नव्हते. त्यावेळेस राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पदाची जबाबदारी स्विकारून तोडगा काढावा म्हणून कर्मयोगी साखर कारखान्यावर शेतक-यांसह नेत्यांनी धरणे आंदोलन केले होते.
सोलापूर-पुणे रास्ता रोको झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढली. आंदोलनादरम्य़ान कुंडलिक कोकाटे हा तरूण शेतकरी शहीद झाला. यानंतर शेकडो शेतक-यांना अटक करण्यात आली. आठवडाभर झालेल्या आंदोलनरूपी संघर्षानंतर राजारामबापू कारखान्याने २५०० रूपये पहिली उचल जाहीर केली व उसदराची कोंडी फोडली.
राज्यभर आंदोलन झाल्याने हजारो आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र राज्यातील उस उत्पादक शेतक-यांना या आंदोलनाने प्रतिटन ३०० रूपये जादा दर मिळाला होता.इंदापूर न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एच. फारूकी यांचे कोर्टात या गुन्ह्याचे न्यायालयीन कामकाज पार पडले. ॲड. एन. जे. शहा ,ॲड. महेश ढुके, ॲड. श्रीकांत करे यांनी यांसदर्भात विनामुल्य काम पाहिले.





