Khatav News : शेतकऱ्यांचा विजय! आंदोलनानंतर गोपूज ग्रीन पॉवर शुगरकडून थकीत बिले जमा
Khatav News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर गोपूज ग्रीन पॉवर शुगरने २८०० रुपये दराने एफआरपी जमा केली.

Khatav News – खटाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे ऊस बिलाची रक्कम मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. गोपूज ग्रीन पॉवर शुगर लिमिटेडने एफआरपीप्रमाणे 2800 रुपये दराने ऊस बिलाची रक्कम संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहे.
हंगामाच्या सुरुवातीला या साखर कारखान्याकडून 3300 रुपये दर घोषित करण्यात आला होती. मात्र, देयके थकवल्याने शेतकरी संतप्त झाले होते. मार्च महिन्याच्या तोंडावर शेतकर्यांवर आर्थिक जबाबदार्यांचा प्रचंड ताण आला होता. बँकांच्या कर्जाचे हप्ते भरणे, पीक कर्जाचे नूतनीकरण, खत व बियाणांचे थकीत देणे, वीज बिल भरणे, मजुरांचे पैसे, घरगुती खर्च,
मुलांच्या शिक्षणाची फी आणि पुढील हंगामासाठी शेतीची तयारी यासाठी पैशांची अत्यंत निकड असताना, ऊस बिल न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन करण्यात आले होते. शेतकर्यांनी आक्रोश मोर्चाचा इशारा दिल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने थकीत देयके अदा केली.
या आंदोलनात संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, विजय देवकर, शंकर देवकर, मधुकर देवकर, शंकर देशमुख, विखळे, बनपुरी, उंबर्डे, पेडगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक झुंझार आसबे, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश यादव व इतर अधिकारी उपस्थित होते.





