Raju Shetti – कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याच्या उत्पादनात यंदा जवळपास ८० ते ९० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे हापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. हापूसला योग्य भाव मिळावा, तसेच आंब्यातील भेसळ थांबावी, यासाठी बाजार समितीसह आडतदार वर्गाने पुढाकार घ्यावा. शहरात कोठेही हापूसच्या नावावर अन्य आंब्याची विक्री झाली, तर जेथून त्याला पुरवठा झाला आहे. त्याठिकाणी रस्त्यावर आंबे ओतून आंबा पार्टी करण्यात येईल, असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी, बाजार समिती प्रतिनिधी आणि आडतदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात पार पडली. या वेळी सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद, गणेश घुले, संतोष नांगरे यांसह अन्य संचालक, आडतदार सिद्धार्थ कुंजीर, सिद्धार्थ खैरे, नितीन कुंजीर आदी आडतदारांसह आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, की सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर याठिकाणी शेतकरी ते थेट ग्राहक यादृष्टीने विक्री करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पुण्यातही या गोष्टी राबविण्याबाबत विचार सुरू आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, पालघर, तसेच अन्य कोकणातील शेतकऱ्यांचेही आंबे कशाप्रकारे बाजारात, येतील यादृष्टीने आडतदारांनी प्रयत्न करावा. या वेळी शेतकऱ्यांच्या फळांना चांगला भाव मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही बाजार समिती व आडतदारांनी दिली. बैठकीतील प्रमुख मुद्दे – हापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजार आवारात जागा द्यावी – भेसळविरोधात प्रशासनासह आडतदारांनी पावले उचलावी – व्यापारी वर्गाने योग्य भाव मिळवून द्यावा – उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने कार्यवाही व्हावी – भेसळ न करण्याची ताकीद किरकोळ विक्रेत्यांना द्यावी