Raju shetti | Uddhav Thackeray – कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदा झालेल्या मोठ्या नुकसानीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आला आहे. अवकाळी हवामान, पाऊस आणि बदलत्या हवामानाच्या तडाख्यामुळे आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान झाले असून अद्यापही शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवावा, अशी भूमिका ते सातत्याने मांडत आहेत. याच अनुषंगाने राजू शेट्टी यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच हर्षवर्धन सपकाळ यांचीही भेट घेतली होती. या भेटींमध्ये शेतकरी प्रश्न, नुकसानभरपाई आणि सरकारकडे दबाव वाढवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. Raju shetti दरम्यान, आज दुपारी १ वाजता राजू शेट्टी हे मुंबईतील मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत कोकणातील शेतकरी संकट, नुकसानभरपाईचा मुद्दा आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी संघटनांचा वाढता दबाव आणि विरोधी पक्षांची एकजूट यामुळे या प्रश्नावर सरकारवर राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत या विषयावर मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. आंबा-काजू बागायतदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार : ( Raju shetti) गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाने झालेल्या नुकसानीत हेक्टरी ५ लाख व ३ लाख रूपये नुकसान भरपाई मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. राज्य सरकारने हेक्टरी २२ हजारांची मदत जाहीर करून बोळवण केली आहे. यामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानभरपाई बाबत राज्य सरकारने आज अखेर कोणतेही पंचनामे अथवा प्रशासकीय आदेश दिलेले नाहीत. एकीकडे २५ हजार कोटींचा कुंभमेळा ३५ हजार कोटी व ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ १ लाख कोटींपर्यंत खर्च करण्यास मान्यता दिली जात आहे. मात्र दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर,ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना राज्य सरकार आंबा बागायतदार शेतकऱ्यांची चेष्टा करू लागले आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.