Rajgurunagar News: राजगुरुनगर देशभक्तीच्या रंगात न्हाले! ‘हर घर तिरंगा’ रॅलीने संपूर्ण परिसर दुमदुमला
Rajgurunagar News: नवी पिढी जपतेय स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव; राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत राजगुरुनगरमध्ये जनजागृती.

Rajgurunagar News – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा संदेश दिला.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर आणि सचिव हरिभाऊ सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव नव्या पिढीला करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
महाविद्यालय परिसरातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत उत्साहाने सहभाग नोंदविला. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच ‘तिरंग्यासोबत छायाचित्र’ या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी सहभाग घेत राष्ट्रध्वजासोबत छायाचित्रे काढून देशभक्तीचा संदेश दिला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. जगताप, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. तुषार वेहळे, विज्ञान विभागप्रमुख प्रा. आरती इंदाईस, कला विभागप्रमुख प्रा. शशिकांत बुरुड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जी. आहेरकर, प्रा. अर्चना सांडभोर, प्रा. मोनाली काळे, प्रा. स्नेहल आदक, प्रा. केतकी गावडे, प्रा. हर्षदा कोळी, प्रा. रुचिका कोकणे, प्रा. ज्योती राळे, प्रा. श्रुती पाटील, प्रा. किशोरी गुजर, प्रा. जयश्री बढे, प्रा. कोमल कालेकर, प्रा. निकिता कारले, प्रा. योगिता डुंबरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





