Satara: शिष्यवृत्ती परीक्षेत ५७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत. जिल्हा गुणवत्ता यादीत चौथी व सातवीचे ९६९ विद्यार्थी चमकले
Satara चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा मंगळवारी अंतरिम निकाल जाहीर झाला. चौथीमधील ग्रामीण १२, शहरी १३ आणि सीबीएसई, आयसीएसईमधील २ तर सातवीमधील ग्रामीण ७, शहरी २३ असे ५७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

Satara: पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत जिल्ह्यातील ५७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. जिल्हा गुणवत्ता यादीत ९६९ विद्यार्थी आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दिली.
चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा मंगळवारी अंतरिम निकाल जाहीर झाला. चौथीमधील ग्रामीण १२, शहरी १३ आणि सीबीएसई, आयसीएसईमधील २ तर सातवीमधील ग्रामीण ७, शहरी २३ असे ५७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २२ हजार ३६९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६ हजार ९४२ विद्यार्थी पात्र झाले असून त्याची टक्केवारी ३१.८५ आहे. सातवीसाठी १५ हजार ३४१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४ हजार ५३१ विद्यार्थी पात्र झाले असून त्याची टक्केवारी ३०.४७ आहे.
जिल्हा गुणवत्ता यादीत जावळी तालुक्यातील ३६, कराड १७७, खंडाळा ११२, खटाव १४३, कोरेगाव ७३, महाबळेश्वर ६, माण ४५, पाटण ४२, फलटण ८५, सातारा १५२, वाई तालुक्यातील ९८ असे ९६९ विद्यार्थी आले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती सौ. तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदींनी अभिनंदन केले.
आठ विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ताधारक
चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील आठ विद्यार्थी राज्यस्तरीय शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. वडले (ता. फलटण) येथील आरती महादेव औंडे हिने चौथीमध्ये ९७.३३ टक्के गुण मिळवत ग्रामीणमधून राज्य गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. वडूजच्या शिवाजी प्राथमिक शाळेतील राजवर्धन भारत सानप याने चौथीमध्ये शहरी भागातून ९५.३३ टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक, अब्दागिरेवाडी (ता. फलटण) येथील रुद्रप्रताप रणजित निंबाळकर याने चौथीमध्ये ग्रामीणमधून ९६ टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक, भोसरे (ता. खटाव) येथील शिवम अमोल फडतरे याने ९५.३३ टक्के गुण मिळवत सहावा क्रमांक, पिंपरी (ता. कोरेगाव) येथील निर्विघ्न रुपेश जाधव याने सातवीमध्ये ग्रामीणमधून ९४ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक, शेंदुरजणे (ता. वाई) येथील सारंग सागर गायकवाड याने ९४ टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक, खटावच्या सी. एस. हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या गीत गोपीनाथ घोडके याने शहरी भागातून ९६.६६ टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक, रहिमतपूरच्या आदर्श विद्यालयाच्या समर्थ लक्ष्मण कदम याने ९६ टक्के गुण मिळवत शहरी भागातून चौथा क्रमांक मिळवला.





