Rajgurunagar News: प्रशासनाचा कारभार खड्ड्यात? संतप्त नेत्याने राजगुरुनगरमध्ये स्वतःच्या पैशाने बसवले गतिरोधक
Rajgurunagar News: तिन्हेवाडी रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी स्वराज्य पक्षाचे सोमनाथ ढोले यांचा पुढाकार; प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर स्वखर्चाने बसवले प्लास्टिकचे गतिरोधक.

Rajgurunagar News – राजगुरुनगर शहरातील वर्दळीच्या तिन्हेवाडी रस्त्यावर वाहनांचा वाढता वेग आणि वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ नारायण ढोले यांनी स्वखर्चाने दोन ठिकाणी प्लास्टिकचे गतिरोधक बसविले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या कार्यवाहीची प्रतीक्षा न करता घेतलेल्या या पुढाकाराचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.
राजगुरुनगर शहरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने तिन्हेवाडी रस्ता महत्त्वाचा आहे. या मार्गावरून हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल, तिन्हेवाडी, सांडभोरवाडी, कोहिनकरवाडी, बुट्टेवाडी आदी भागांत जाणार्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांचीही दिवसभर या मार्गावरून ये-जा सुरू असते. मात्र, वाहनांची वाढती वर्दळ आणि वेगामुळे या मार्गावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे तिन्हेवाडी रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. याबाबत नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेकडे मागणी करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सोमनाथ ढोले यांनी पुढाकार घेत तिन्हेवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी स्वखर्चाने गतिरोधक बसविले.
त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होऊन संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ढोले यांनी यापूर्वीही राजगुरुनगर शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार विविध ठिकाणी स्वखर्चाने गतिरोधक बसविले आहेत.
“प्रशासनाने नवीन रस्ते तयार करतानाच त्या रस्त्याच्या निविदेत गतिरोधक बनविण्याची तरतूद केली पाहिजे. त्यामुळे नंतर गतिरोधकासाठी स्वतंत्र निधी मिळेपर्यंत नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. रस्ते तयार करताना नागरिकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय मानून त्याचवेळी आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत.”
– सोमनाथ ढोले, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, स्वराज्य पक्ष





