Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय काय? नगरसेवक ठाकरेंचे अन् शिंदे गटाचा भाजपला जबरदस्त धक्का
Maharashtra Politics : धाराशिवमध्ये भाजप प्रवेशासाठी निघालेले ठाकरे गटाचे चार नगरसेवक इंदापूरहून माघारी फिरले आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. पक्षांतरानंतर बॅनरबाजीने खळबळ.

Maharashtra Politics : धाराशिव शहराच्या राजकारणात नगरसेवकांच्या पक्षांतरावरून मोठी उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे गटातील नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे.
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे निघालेले चार नगरसेवक इंदापूरपर्यंत पोहोचल्यानंतर अचानक माघारी फिरले. त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून ते ठाण्यात पोहोचले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
इंदापुरातून ‘यू-टर्न’, थेट ठाण्यात प्रवेश –
ठाकरे गटातील नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक नगरसेवकांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र, इंदापूर येथे या नगरसेवकांनी अचानक निर्णय बदलत धाराशिवकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी सूत्रे हाती घेत त्यांना ठाण्यात नेले. तेथे शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटातील चार नगरसेवकांनी निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. निंबाळकर यांनीही काही काळापूर्वी ठाकरे गट सोडून शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतराला वेग आला असून, आता नगरसेवकांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
कळंबनंतर धाराशिवमध्ये भाजपचा डाव?
कळंब नगर परिषदेत ठाकरे गटातील दहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर धाराशिव शहरातील नगरसेवकांनाही भाजपच्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे सध्याची घडामोड भाजप आणि शिंदेसेनेतील स्थानिक राजकीय वर्चस्वाच्या संघर्षाचा भाग मानली जात आहे.
दरम्यान, पक्षांतरामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा असल्याचे दावे स्थानिक पातळीवर केले जात आहेत. नगरसेवकांना कोट्यवधींची बोली लावल्याची कुजबुजही आहे. मात्र, या कथित आर्थिक व्यवहाराला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
‘एक खोका, मतदाराला धोका’; बॅनरबाजीने खळबळ
नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर मतदारांचा संतापही समोर आला आहे. यातील एका नगरसेवकाच्या घरासमोर बॅनर लावण्यात आले. त्यावर ‘एक खोका, मतदाराला धोका’, ‘आमचे मत आम्हाला परत द्या’, ‘हा शिक्का पुसला जाणार नाही’ आणि ‘एक कोटींचा गद्दार’ असा मजकूर आहे. हे बॅनर नेमके कोणी लावले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
‘ऑपरेशन लोटस 2.0’ला ‘ऑपरेशन टायगर’चा ब्रेक?
ठाकरे गटातील नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याच्या प्रयत्नांना स्थानिक राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन लोटस 2.0’ म्हटले जात होते. मात्र, भाजपकडे जाण्याऐवजी नगरसेवक शिंदेसेनेत दाखल झाल्याने ‘ऑपरेशन टायगर’ने लोटसला ब्रेक लावल्याची चर्चा आहे. या नावांची अधिकृत पुष्टी संबंधित पक्षांकडून झालेली नाही.





