Dehu Road: डोकं ठिकाणावर आहे का? १०० मीटरमध्ये १६ गतिरोधक; कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अजब कारभार
Dehu Road: इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) निकषांना केराची टोपली; देहूरोड - एम.बी. कॅम्प आणि विकासनगर मार्गावर चुकीच्या पद्धतीने गतिरोधक उभारल्याचा आरोप.

Dehu Road – देहूरोड – एम.बी. कॅम्प तसेच विकासनगर मार्गावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने गतिरोधक उभारल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अवघ्या १०० मीटर अंतरात तब्बल १६ गतिरोधक उभारण्यात आल्याने वाहनचालक, विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांची शक्यता वाढल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उंचवट्यासारखे बांधण्यात आलेले हे गतिरोधक एकमेकांपासून अत्यंत कमी अंतरावर आहेत. त्यामुळे वाहनांचे संतुलन बिघडून गेल्या दोन दिवसांत अनेक दुचाकीस्वार महिला किरकोळ अपघातांना सामोरे गेल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देहूरोड – विकासनगर मार्गावरील शंकर मंदिर परिसर तसेच एम.बी. कॅम्प मार्गावर उभारण्यात आलेल्या गतिरोधकांवर आवश्यक ते पांढरे पट्टे रंगविण्यात आलेले नाहीत. तसेच पुढे गतिरोधक आहे, असे सूचना फलक किंवा रात्रीच्या वेळी वाहनचालकांना गतिरोधक स्पष्ट दिसावेत यासाठी आवश्यक परावर्तक (कॅटआय) बसविण्यात आले नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे रात्रीच्या वेळी अचानक गतिरोधक समोर आल्याने वाहनांना जोरदार धक्के बसत असून अपघाताचा धोका वाढत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार गतिरोधक उभारण्यासाठी विशिष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या निकषांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने गतिरोधक उभारण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरातील शंकर मंदिर आणि महात्मा गांधी विद्यालय परिसरातील गतिरोधक विशेषतः विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या गतिरोधकांची पाहणी करून निकषांनुसार त्यांची पुनर्रचना करावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) देहूरोड शहरप्रमुख दीपक चौगुले आणि मनसेचे मोझेस दास यांनी केली आहे.
इंडियन रोड काँग्रेसनुसार गतिरोधकांचे प्रमुख निकष
वाहतूक पोलिसांच्या शिफारशीनंतरच गतिरोधक उभारावेत. शाळा, रुग्णालय, बालवाडी, अंगणवाडी यांसारख्या संवेदनशील ठिकाणीच गतिरोधकांना प्राधान्य द्यावे. गतिरोधकाची रुंदी ३.७ मीटर आणि उंची १० सेंटीमीटर असावी. दोन्ही बाजूंचा उतार १.२० मीटर असावा. दोन गतिरोधकांमधील अंतर १०० ते १२० मीटर ठेवावे. गतिरोधकाच्या किमान ४० मीटर आधी सूचना फलक लावणे आवश्यक आहे. तसेच गतिरोधकांवर काळे-पांढरे पट्टे रंगविणे बंधनकारक आहे. आणि रात्री चालकांना गतिरोधक स्पष्ट दिसण्यासाठी परावर्तक (कॅटआय) बसविणे आवश्यक आहे.






