Rajgurunagar Crime: राजगुरुनगर हादरले! पत्नीचा खून करून मुलावर चाकूहल्ला; फरार पतीचा असा झाला दुर्दैवी शेवट
Rajgurunagar Crime: वाडा रोडवर राहणाऱ्या माजी सैनिक महेंद्र दौंडकरचा कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; घटना पाहणाऱ्या १७ वर्षांच्या मुलावरही केला चाकूहल्ला.

Rajgurunagar Crime – पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर फरार झालेल्या माजी सैनिक पतीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. 2) सकाळी चांडोली गावच्या हद्दीत उघडकीस आली. महेंद्र शिवाजी दौंडकर (वय 45, रा. संगम गार्डन, वाडा रोड, राजगुरुनगर) असे मृताचे नाव आहे. पत्नीच्या खुनानंतर त्याने 17 वर्षीय मुलावरही चाकूहल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
खेड पोषलसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 30) रात्री संगम गार्डन, राजगुरुनगर येथे राहणार्या महेंद्र दौंडकर याने पत्नी दीपा महेंद्र दौंडकर हिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. ही घटना त्यांचा 17 वर्षीय मुलगा अथर्व याने पाहिल्यानंतर महेंद्र याने त्याच्यावर चाकूहल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर महेंद्र दौंडकर घरातून फरार झाला होता.
याप्रकरणी मुलगा अथर्व याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार महेंद्र दौंडकर याच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा तसेच मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर खेड पोलीसांकडून महेंद्र याचा शोध सुरू होता. दरम्यान, बुधवारी (दि. 2) सकाळी चांडोली गावच्या हद्दीतील कांदा-लसूण संशोधन केंद्राजवळील रुक्मिणी मंदिराच्या मागील परिसरात महेंद्र दौंडकर यांचा मृतदेह आढळून आला.
त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





