Mystery Death: दुचाकी, मोबाईल अन् पाकीट जागेवरच! नारायणगावला निघालेल्या तरुणाचा जंगलात दुर्दैवी अंत
Mystery Death: गुरे चारणाऱ्या ग्रामस्थांना मृतदेह दिसल्यानंतर घटना उघडकीस; कारण अद्याप अस्पष्ट, पोलीस तपास सुरू.

Mystery Death – 31 ऑगस्ट रोजी घरातून दुचाकीवरून बाहेर पडलेला शिंदेवाडी आणे (ता. जुन्नर) येथील संदीप सुदाम शिंदे (वय 38) हा तरुण बेपत्ता झाल्यानंतर सुरू असलेल्या शोधमोहीमेचा बुधवारी (दि. 2) दुर्दैवी शेवट झाला. आबाटेक येथील जंगलात संदीप यांचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. मात्र, जंगलात मृतदेह आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संदीप शिंदे हे 31 ऑगस्ट रोजी टोमॅटोचे पैसे आणण्यासाठी दुचाकीवरून नारायणगाव येथे गेले होते. सायंकाळी सुमारे पाच वाजता त्यांचे वडिलांशी फोनवरून संभाषण झाले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. 1 सप्टेंबर रोजी आळे-बोरी रस्त्यावरील बोरी बुद्रुक हद्दीतील कालव्याच्या पुलाजवळ संदीप यांची दुचाकी आढळून आली.
विशेष म्हणजे, दुचाकीची चावी, मोबाईल आणि पाकीटही तेथेच होते. त्यामुळे संदीप नेमके कुठे गेले, याबाबत कुटुंबीयांसह ग्रामस्थांचा संभ्रम वाढला. यानंतर कुटुंबीयांनी कालव्यालगत तसेच आसपासच्या परिसरात शोध घेतला. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात संदीप बेपत्ता झाल्याची खबरही देण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास आबाटेक येथील जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास संदीप यांचा मृतदेह आढळून आला.
त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच आळेफाटा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर हा मृतदेह बेपत्ता संदीप शिंदे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. संदीप यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. संदीप यांच्या बेपत्त्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर त्यांच्या मृतदेहाच्या आढळण्याने दुर्दैवी पूर्णविराम मिळाला. या घटनेने आणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





