Rajasthan Election: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना जाहीर चर्चा करण्याचे चॅलेंज

जयपूर – विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या राजस्थानातील वातावरण आता प्रचारामुळे तापू लागले आहे. अशात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना जाहीर चर्चा करण्याचे चॅलेंज दिले आहे. राजस्थानात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसने मतदारांना 7 गॅरंटी दिल्या आहेत. त्या हमींची खिल्ली भाजपच्या नेत्या राजे प्रचारावेळी उडवत आहेत.
कॉंग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकण्यास जनता काही मूर्ख नाही. स्वत:चीच गॅरंटी नसलेला पक्ष (कॉंग्रेस) जनतेला गॅरंटी देत असल्याचे आश्चर्य वाटते, असे त्यांनी गुरूवारी म्हटले. त्यावर कॉंग्रेस नेते गेहलोत यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली.
कॉंग्रेसने दिलेल्या हमी निवडणुकीतील प्रमुख मुद्दा आहे. त्यावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान मी राजेंना देतो, असे भाष्य त्यांनी केले. राजस्थानात यावेळीही कॉंग्रेस आणि भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट लढत होत आहे. त्या राज्यात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. त्या राज्यातील निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होईल.




