Raj Thackeray : “मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तडजोड होणार नाही”; राज ठाकरेंची आक्रामक भूमिका

Raj Thackeray – मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तडजोड होणार नाही, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांना सुनावले आहे. यानंतर सरकार अशा उद्योगात पडणार नाही, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
इतकेच नाही तर आता अधिवेशनात या विषयावर वेळ वाया घालवू नका, असा सल्ला देखील त्यांनी विरोधी पक्षातील आमदारांना दिला आहे. राज्यातील इतर प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठवा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक प्रश्न तुंबलेले आहेत. त्यामुळे त्या प्रश्नावर बोलावे. शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत, शाळा नाही, शिक्षकांना पगार नाहीत, एकेका शिक्षकावर वर्क लोड टाकला जात आहे, इतरही कामे देखील शिक्षकांना दिले जात आहेत. इतके विषय आहेत, त्या विषयावर विरोधकांनी हात घालावा, असा सल्ला देखील त्यांनी आहे.
विजयी मेळाव्याला पक्षाचे लेबल नको !
अध्यादेश रद्द झाल्यानंतर संजय राऊत यांचा फोन आला होता. त्यांनी पाच तारखेला मेळावा घेण्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप ठिकाण वगैरे जाहीर करू नका, असे मी त्यांना सांगितले आहे. माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
हा मेळावा झाला तरी देखील त्याला पक्षाचे लेबल नसेल. या विषयाला सर्वांनी पक्षाच्या पुढे जाऊन पाहिले पाहिजे. त्यामुळे विजयी मेळाव्याचे अद्याप ठिकाणी ठरलेले नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
युती होतील, तुटतील मात्र मराठी भाषा एकदा तुटली तर ती परत येणार नाही. मराठी भाषेच्या माध्यमातून संस्कृती टिकून आहे. ती जर गेली, युती-आघाड्यांना काय अर्थ? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.





