Raj Thackeray : राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची ‘दिल से’ पोस्ट; अभिनेत्री काय म्हणाली एकदा पाहाच….

Tejaswini Pandit On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आज 57 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबाबरोबर बाहेर गेले असून ते आज कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत. एकीकडे राज यांचा वाढदिवस असतानाच दुसरीकडे त्यांचे पुतणे आदित्य ठाकरेंचाही 35 वा वाढदिवस आहे.
उत्कृष्ट वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्वामुळे राज ठाकरे हे तरुणांचे नेते मानले जातात. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेपासून ते त्यांच्या स्वतःच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय प्रवासात राज यांनी अनेक चढऊतार पाहिले आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्वाबद्दल महाराष्ट्राला आकर्षण कायम आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या वाढदिवशी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने खास पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तेजस्विनीने आपल्या शब्दांत राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाची स्तुती करताना त्यांना “मराठी अस्मितेचा आधार”, “भाषेचा पोषिंदा” आणि “मनस्वी व्यक्तिमत्त्व” असं म्हणत त्यांची स्तुती केली आहे.
तेजस्विनी पंडितने लिहलं की, “मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला, मराठी भाषेच्या पोषिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि ह्या सगळ्या पलीकडे एका मनस्वी ,सच्च्या, अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा ! राजसाहेब खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केंव्हाच सोडून दिलं ! देव तुम्हाला दीर्घायु देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ! हसत रहा..” असं अभिनेत्रीने म्हंटलं आहे.
View this post on Instagram
अन् राज ठाकरेंनी बाळासाहेबांची साथ सोडून नवा पक्ष सुरु केला….
2004 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या अनेक समर्थकांची तिकिटे कापण्यात आलं, अशी चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे शिवसेना पक्षात अस्वस्थ झाले. त्यानंतर 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे कोणत्याही पक्षात सामील झाले नाही.
त्याऐवजी, 9 मार्च 2006 रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाची स्थापना केली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याबाबत केलेले भाषण लोकांना अजूनही आठवते. लोकांना अजूनही त्यांचे शब्द आठवतात की, ‘माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नसून त्याच्या सभोवतालच्या बडव्यांशी आहे’.
मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सुरुवातीला निळा, भगवा आणि हिरवा रंगांचा झेंडा आणला. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केला. मनसेला तरुणांनी मोठा प्रमाणात प्रतिसाद दिला. पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माणातून 13 आमदार निवडून आले होते.





