Raj Thackeray : “मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही…” – राज ठाकरे

Raj Thackeray । Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात सध्या विधानसभेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. अनेक मोठे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्यासाठी एक प्रचार सभा घेतली.
यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी महायुतीसह महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, “राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ही उमरखेडमध्ये झाली होती. शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांना बघायला कोणी येत नाही. त्यांचे कुटुंब काय करते ते ही बघत नाही.
कारण आता माणसाची काही किंमतच उरली नाही. आमची मने मेली आहेत. जर तुम्ही जिवंत आहात असे वाटत असेल तर आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा आणि मनसेला मतदान करा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘मी येताना रस्ता पाहिला, काय रस्ता आहे हा? एका बाजूला खडी टाकली आहे. मी असा रस्ता जगात पहिला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2024 साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या.
मी विकास कसा होतो, हे पाहिलं आहे. मी नाशिकमध्ये रस्ते बनवले. किती वर्षे झाले पाहा, अजूनही ते तसेच आहेत. कंत्राटदारकडून टक्के घेणं बंद झाला की रस्ते चांगले होतात. मला रस्त्यात खड्डा दिसला तर खड्ड्यात बांधून मारेन असा दम मी कंत्राटदारला दिला होता, असा किस्साही राज ठाकरेंनी सांगितला.
सगळ्या गोष्टी शक्य आहे. फक्त इच्छा पाहिजे. मला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही. पण मला महाराष्ट्राच्या विकासाची नक्कीच स्वप्न पडतात. राज्यकर्ते आणि राजकीयच्या मेंदूत कमतरता आहे. 20 नोव्हेंबर ही तारीख जवळ आली आहे. सारखी सारखी संधी भेटत नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.





