मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त असणारे राज शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान ते पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. अगोदर कोविड डेड सेलमुळे राज ठाकरेंना वैद्यकीय भूल (अॅनेस्थेशिया) देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते मात्र नंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याने राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयात उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे देखील रुग्णालयात पोहोचले. याच चाचण्यांदरम्यान कोविड डेड सेल्समुळे भूल देता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. राज ठाकरे यांनी यापूर्वीच पुण्यातील सभेतून पायाच्या दुखण्याबाबत माहिती दिली होती. दोन ते तीन महिने आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचंही त्यांनी सभेतून सांगितलं होतं. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी रुग्णालयात दाखल होणं आवश्यक असतं, याचं पालन राज ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे.