Nagar | पावसाचे पाणी गाळ्यामध्ये घुसले ; व्यावसायिकांना मोठा फटका

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, या पावसाचे पाणी गाळ्यामध्ये घुसले आहे. खराब झालेल्या गटारी व फुटलेले पाईप दुरुस्त न केल्यामुळे या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पालिकेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. पालिकेने तातडीने त्या गटारी दुरुस्त करून द्याव्यात, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.
श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोडवरील गटारी व त्यासाठी पाईपलाईन खूपच खराब झाले असून, त्या पाईपलाईन फुटलेल्या आहेत.
तयार करण्यात आलेले चेंबरही खराब झाले असून यामुळे पावसाचे जादा आलेले पाणी सरळ एकनाथ टाॅवर्स या ठिकाणी असलेल्या गाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साचले.
गाळ्यांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने व्यावसायिकांचे संगणक, फर्निचर व गाळ्यामध्ये असलेला माल पूर्णपणे खराब झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या गटारी अनेक दिवसांपासून घरापासून तेथील पाईपलाईनही फुटलेली आहे व चेंबरही खराब झाले आहेत. याबाबतची तक्रार या व्यावसायिकांनी पावसाळा सुरू होण्याअगोदरच पालिकेला दिली होती, मात्र पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे खराब झालेले गटारी व फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त होऊ शकले नाही. अधिकाऱ्यांना वारंवार सांगून्ही दुर्लक्ष केले.
बांधकाम विभाग आरोग्य विभागाकडे तर आरोग्य विभाग बांधकाम विभागाकडे बोट दाखवून टाळाटाळ करीत होते.त्यामुळे व्यावसायिकांना हा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. या आर्थिक फटक्याबरोबरच व्यावसायिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मागील मुख्याधिकारयांनी याबाबत पाईप लाईन टाकून चेंबर दुरुस्त करून बांधकाम अभियंता यांना सांगितले होते. मात्र, त्यांनी वेगळी कारणे देऊन सदरची कामे पुढे ढकलली. अजूनही पावसाळा चार-पाच दिवस राहणार असल्याने व्यावसायिकांपुढे मोठा प्रश्न पडला आहे.
या नुकसानीला कोण जबाबदार? त्यामुळे सदरचे काम तातडीने हाती न घेतल्यास येथील व्यावसायिक नगरपालिकेतून जोपर्यंत काम होत नाही, तोपर्यंत ठिय्या करतील, असा इशारा या व्यावसायिकांनी दिला आहे.
शिवाजी रोडवरील एकनाथ टाॅवर्समधील व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नाचे निवेदन दिले. याप्रसंगी प्रशांत पटारे, कांतीलाल बोकडिया, बंटी वाघ, मयूर बोरसे, राहुल लबडे, किशोर छतवाणी, नयन ठोंबरे, शाम फुलपगार, अमोल वाघमारे आदी उपस्थित होते.





