बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; दिंद्रुड परिसरातील कोथाळ्याच्या सरस्वती नदीला पूर

माजलगाव – जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोथाळा येथील सरस्वती नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी थेट गावालगत असलेल्या पुलावरून वाहिल्याने परळी तालुक्यातील सिरसाळ्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली.
त्याचबरोबर माजलगाव तालुक्यातील नित्रुड, शिंदेवाडी, पात्रुड, घळाटवाडी परिसरात असलेल्या लेंडी नदीला देखील पूर आल्याने या भागातील नागरिकांची यातायात झाल्याचे पाहायला मिळाले. तर या पावसामुळे या भागातील पाण्याची चिंता देखील मिटणार असल्याचे दिलासादायक चित्र आहे. कारण, पूराचे पाणी सिंदफणा नदीपात्रात जात असल्याने या भागातील पाणीटंचाईपासुन सुटका होणार आहे.
दुष्काळांच्या झळांनी होरपळणाऱ्या मराठवाड्याला मान्सूनच्या सरींनी मोठा दिलासा दिला आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, धाराशिव आणि जालना या 5 जिल्ह्यांमध्ये मागच्या दोन दिवसांपासून मान्सूनच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे कुठे नदीला पाणी आले, कुठे प्रकल्पाचाही पाणीसाठा वाढलाय. पूर्ण उन्हाळा दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाने दोन दिवसातच पाणीदार केले आहे.
परभणी मंडळातही चांगला पाऊस
परभणीत दोन दिवसात जवळपास 38 मिमी पाऊस झालाय त्यात केकरजवळा मंडळात अतिवृष्टी झालीय. जोरदार पाऊस झाल्याने कोरडी पडलेल्या गोदावरीला पाणी आले आहे तर तिकडे लोअर दुधना प्रकल्पात 4% नी पाणी साठा वाढलाय महत्त्वाचे म्हणजे काल वीज पडून 2 जणांसह एका बैलाचा मृत्यू झाला आहे.
लातूरच्या बाजारपेठेत शिरले पाणी
लातूरमधील आठवडी बाजाराच्या मैदानात पाणी साचल्यामुळे आठवडी बाजार रस्त्यावर भरला तर लातूर उदगीर महामार्गावरील नळेगाव येथील पुलाशेजारील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने उदगीर लातूर महामार्ग पूर्णपणे बंद आहे. तसेच पावसामुळे रेना मध्यम प्रकल्पात 2 टक्के पाणीसाठा वाढलाय. शिरूर अनंतपाळ उदगीर राज्य महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी पूल उभा करण्यात आला होता. तोही पावसामुळे वाहून गेल्याने हा रस्ता ही बंद आहे.
धाराशिवमध्येही मुसळधार पाऊस
धाराशिव जिल्ह्यातही कालपासून मुसळधार पाऊस बरसतोय. जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यातील पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. माडस मुरूम येणेगुर तुटोरी या गावातील नदी नाले तुडुंब वाहताहेत तसेच कळंब धाराशिवसह अनेक भागातही मान्सूनची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धाराशिव शहरातील बस स्थानकातही पाणी साचल्यामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.





