पुण्यात पावसाचा कहर….! ‘या’ परिसरातील १० वर्षीय चिमुकल्याचा वीजेचा शॅाक लागून मृत्यू

Unseasonal weather wreaks havoc in Pune : मागील तीन दिवसांपासून पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मात्र, काल जोरदार झालेल्या अवकाळी पाऊसाने पुणेकरांची चांंगलीचं दाणादाण उडवली. पावसामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. शहरातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा धूमाकूळ चालू असतानाच पुण्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवारी रात्री पुण्याच्या वारजे परिसरात दहा वर्षांच्या मुलाचा वीजेचा शॅाक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कडाक्याचा पाऊस सुरू असतानाच घरासमोर असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मयंक उर्फ दादु प्रदीप आडागळे (वय 10) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुणे शहरात मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने रात्री कहर केला. अनेक भागांतील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. तर १५ ठिकाणी झाडपडीची घटना देखील घडल्या. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुढील ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय होणार असून, यावेळी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
शहरातील पावसाची नोंद (मंगळवार)
शिवाजीनगर रात्री साडेआठपर्यंत २३.६ मिमी
चिंचवड येथे ९३.५ मिमी रात्री १० वाजेपर्यंत
हडपसर ६७.५ मिमी
लवळे ३४.२ मिमी
वडगाव शेरी ५८.५
तळेगाव ४० मिमी
कोरेगाव पार्क येथे ९ मिमी





