Pune Gramin : राजगुरूनगरमध्ये पावसाचा कहर; भीमानदीला पूर, पाभे गावाचा संपर्क तुटला

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील भोरगिरी परिसरात झालेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे भीमानदीला मोठा पूर आला असून, परिणामी पाभे गावातील पूल कम बंधारा पाण्याखाली गेला आहे. या पाण्याचा फुगवटा गावात शिरल्याने पाभे गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
भीमानदीवरील पूल कम बंधाऱ्याला बर्गे (ढापे) असल्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह थेट पुलावरून जात आहे. यामुळे पुलाची संरचना धोक्यात आली असून गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फुगवटा वाढल्याने गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
भोरगिरी व भिवेगाव भागात कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे पाण्याचा साठा वाढला असून, या परिसरातील काही घरे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पाऊस आता थांबला असला तरी परिसरात अजूनही पूरस्थितीचे सावट आहे.
या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी बाजारी, कांदा आणि इतर नगदी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे.
खेड तालुक्यातील भोरगिरी परिसरात सुमारे १५० ते २०० मिमी पाऊस झाला आहे. कळमोडी धरण परिसरात ७८ मिमी, चास कमान धरण परिसरात ५७ मिमी, तर भामा-आसखेड धरण परिसरात ४८ मिमी इतका जोरदार पाऊस नोंदविण्यात आला आहे. या आपत्तीतून तातडीने मदत कार्य हाती घेण्याची गरज असून, प्रशासनाने बाधित गावांना तात्काळ मदत पुरवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.





