Rain Update : अवकाळी पावसाने राज्याला झोडपले; मे महिन्यात सलग ८ दिवस धुवाधार

Rain Update – मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळीने पाणी-पाणी केले आहे. हा पावसाचा धडाका शुक्रवारीही अनेक ठिकाणी कायम होता. यंदा प्रथमच मे महिन्यात सलग ८ दिवस पाऊस कोसळल्याने उन्हाळी पिके, भाजीपाल्यासह फळबागांची प्रचंड हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, सलग सुरू असलेल्या पावसामुळे लातूरसह अनेक ठिकाणी पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.
मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांत पावसाचा रोजच धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून, शुक्रवारीही दुपारनंतर बऱ्याच भागात अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले असून, काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
लातूर जिल्ह्यात तर आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही ब-याच भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतपिकांची प्रचंड हानी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. आंबा बागायतदारांना पावसाचा मोठा फटका बसत आहे. पुणे, मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडत असून, पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पाहायला मिळाले.





