Weather Update – देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि आसाम हे राज्य पुराच्या विळख्यात आहेत. या राज्यांमध्ये लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे. आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान पुराच्या पाण्यात बुडाले आहे. त्यामुळे, पाण्यात बुडून एका गेंड्यासह आठ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उद्यानाचे जिल्हा वनाधिकारी अरुण विघ्नेश यांनी दिली आहे. आसाममधील 27 जिल्ह्यांमध्ये 16.25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. बुधवारी (3 जुलै) पुराच्या पाण्यात बुडून 8 जणांचा मृत्यू झाला. सोनितपूर, शिवसागर आणि गोलाघाटमध्ये आणखी तीन जण पाण्यात वाहून गेल्याची भीती आहे. राज्यात पूर, भूस्खलन आणि वादळात मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ५६ वर पोहोचली आहे. बिहारमधील सिवान आणि सारण जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात पाच पूल कोसळले. त्यापैकी तीन गंडकी नदीवर तर दोन धामही नदीवर बांधण्यात आले. राज्यात गेल्या १५ दिवसांत पूल कोसळण्याच्या अशा १० घटना घडल्या आहेत. त्याच बरोबर पुण्यात पिकनिक स्पॉट्सवर ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास, खोल पाण्यात जाण्यास, सेल्फी काढण्यास आणि रील काढण्यास बंदी आहे. लोणावळ्यातील भुशी धरण, पुण्यातील ताम्हिणी घाट आणि कोल्हापुरातील काळम्मावाडी धरण येथे नुकत्याच अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. ही बंदी 2 जुलै ते 31 जुलैपर्यंत लागू राहणार आहे.