Himachal Rain: हिमाचलला पुन्हा पावसाचा दणका; पुरामुळे १२८ रस्ते बंद, नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

Himachal Rain – हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा भूस्खलन झाले असून अचानक आलेल्या पुरामुळे राज्यातील १२८ रस्ते बंद पडले आहेत. प्रादेशिक हवामान कार्यालयाने शनिवारी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति पावसासाठी ॲलर्ट दिला आहे. राज्यात १६ ऑगस्ट पर्यंत ही स्थिती राहील असेही या विभागाने म्हटले आहे.
शुक्रवारी संध्याकाळपासून नाहान (सिरमौर) येथे सर्वाधिक १६८.३ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्यानंतर संधोलेमध्ये १०६.४ मिमी, नगरोटा सुरियानमध्ये ९३.२ मिमी, धौलाकुआनमध्ये ६७ मिमी, आणि जुब्बरहाटीमध्ये ५३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे ४४ वीज पुरवठा केंद्रे आणि ६७ पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. पावसाशी संबंधित घटनांमध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २७ जून ते ९ ऑगस्ट दरम्यान राज्याचे सुमारे ८४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





