Rain Damage: केळवलीत परतीच्या पावसाचा तडाखा! काही मिनिटांत उडाली घरांची छपरे; नागरिक उघड्यावर
Rain Damage: बुधवारी सायंकाळी केळवली परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अनेक घरांची कौले आणि पत्रे उडून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान.

Rain Damage- तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर धरला असून, बुधवारी (दि. ३०) सायंकाळी केळवली परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. अवघ्या काही मिनिटांत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे केळवली गावातील अनेक घरांची पत्रे आणि कौले उडून गेली. त्यामुळे घरांचे तसेच संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
परतीच्या पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे केळवली परिसरातील आदिवासी वाड्यांमधील काही घरांची छपरे उडाली. पत्रे आणि कौले दूरवर जाऊन पडल्याने काही घरे उघडी पडली. त्यात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. परिसरात मोठी झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला.
पळसदरीमार्गे कर्जत रस्त्यावर बांधकाम प्रकल्पासमोर विद्युत खांब तारांसह रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच केळवली, नावढे, वणी, बीड आणि जांबरुंग परिसरातील रस्त्यांवर लहान-मोठी झाडे कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून रस्त्यांवरील झाडे आणि विद्युत खांब हटविण्याचे काम केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
वादळी पावसाचा फटका शेती पिकांनाही बसला असून, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अचानक आलेल्या वादळामुळे घरांचे छप्पर उडून मोठे नुकसान झालेल्या कुटुंबांना आर्थिक मदतीची गरज आहे. महसूल प्रशासन आणि तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत आणि बाधित कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




