Warkari Financial Aid: वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार आर्थिक मदत; संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय
Warkari Financial Aid: श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा आषाढी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; अपघाती निधनानंतर कुटुंबाला मिळणार आर्थिक साहाय्य.

Warkari Financial Aid – आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत श्री संत तुकाराम महाराज संस्थानने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पालखी सोहळ्यादरम्यान पायी वारी करताना एखाद्या वारकऱ्याचा अपघाती निधन झाल्यास संबंधित वारकऱ्याच्या कुटुंबाला संस्थानच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
संस्थानच्या या निर्णयामुळे वारीदरम्यान संकटाला सामोरे जाणाऱ्या वारकरी कुटुंबांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळणार आहे. ही मदत दुःखाची भरपाई नसून संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून वारकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे. आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी पायी प्रवास करीत असल्याने आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही संस्थानने केले आहे.
पुरेसे पाणी पिणे, वेळेवर अन्न सेवन करणे, थकवा जाणवल्यास विश्रांती घेणे तसेच कोणतीही आरोग्यविषयक अडचण जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या संतवचनाचा आधार घेत प्रत्येक वारकऱ्याने स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच सहकारी वारकऱ्यांचीही काळजी घ्यावी. परस्पर सहकार्य आणि शिस्तीच्या माध्यमातून वारी अधिक सुरक्षित,
सुव्यवस्थित आणि मंगलमय करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. या आर्थिक मदतीसाठी संबंधित वारकरी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अधिकृत दिंडीत सहभागी होऊन पायी वारी करणारा असणे आवश्यक आहे. तरेच संबंधित दिंडीची श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडे अधिकृत नोंदणी झालेली असणे बंधनकारक असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.





