Shirur News : शिरूर तालुक्यात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी (दि. २८) रोजी शिरूर तालुक्याच्या बेट भागात पावसाने हजेरी लावली.

Shirur News – महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी (दि. २८) रोजी शिरूर तालुक्याच्या बेट भागात पावसाने हजेरी लावली. पावसाळा सुरु होऊनही महिनाभर लांबणीवर गेलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती मात्र मागील आठवडाभरापासून भाग बदलत सुरु झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असल्याचे दिसून येते.
शिरूर तालुक्याच्या बेट भागातील काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबुत, चांडोह, फाकटे, शरदवाडी, वडनेर खुर्द आदी भागात रविवारी सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. नंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली तर जवळपास सहा वाजेपर्यंत जवळपास दोन तास या पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
शिरूर तालुक्यातील बेट भागात पावसाळा सुरु झाल्यानंतर पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या तसेच या भागात उसाची शेती अधिक प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना वाढती उष्णता आणि पाण्याच्या टंचाई अभावी ऊस लागवड करण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने बळीराजाचे पिकांचे नियोजन विस्कळीत होताना दिसून येत होते.
मात्र अशातच गेली महिनाभर पावसाची वाट पाहुन शेतकऱ्यांना लागलेली चिंता या झालेल्या पावसामुळे मिटल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.





