Pimpri: दमदार पावसाची प्रतीक्षा, पाणी बचत करा; महापालिका प्रशासनाचे आवाहन
Pimpri : धरणक्षेत्रात अद्याप पावसाचा जोर वाढलेला नाही

पिंपरी – पवना धरणातील पाणीसाठ्यात झालेली घट आणि मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.
धरणक्षेत्रात अद्याप पावसाचा जोर वाढलेला नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
शहरातील उपलब्ध जलस्रोतांवर वाढता ताण लक्षात घेऊन महापालिकेकडून पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर करून जलतरण तलाव भरण्यास बंदी घालण्यात आली असून वाहन धुण्यासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पाणी बचतीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच घरगुती पातळीवर पाण्याची गळती रोखणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी गृहनिर्माण संस्था व नागरिकांनी पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवणुकीवर भर द्यावा, असे आवाहन केले आहे. तर कार्यकारी अभियंता महेश बरीदे यांनी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
‘पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. पाणी बचतीच्या सवयी अंगीकारल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित जलसाठा निर्माण करण्यास मदत होईल. प्रत्येक नागरिकाने पाणी जपून वापरून शहराच्या जलसुरक्षेत योगदान द्यावे.’ – रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
Sant-Bhumi : देहू ते आळंदी पालखी मार्ग संतभूमी म्हणून जाहीर करा – अभय टिळक





