Shirur : तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धाक?; तांदळी शिवारात मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा फेकल्याने खळबळ
Shirur : शिरूर तालुक्यातील तांदळी परिसरातील शेतशिवारात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य (एक्सपायरी) खाद्यपदार्थांचा साठा अज्ञात व्यक्तींनी फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Shirur : शिरूर तालुक्यातील तांदळी परिसरातील शेतशिवारात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य (एक्सपायरी) खाद्यपदार्थांचा साठा अज्ञात व्यक्तींनी फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुदतबाह्य व निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात धडक कारवाई सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर हा साठा शेतशिवारात टाकण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, हा साठा नेमका कोणी, कुठून आणि कोणत्या उद्देशाने आणून फेकला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी या ढिगाऱ्यातील खाद्यपदार्थ उचलून नेल्याचेही समोर आले आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थांचे सेवन आरोग्यास घातक ठरू शकते. त्यामुळे या प्रकाराबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाने संपूर्ण साठा जप्त करून सुरक्षित पद्धतीने त्याची विल्हेवाट लावावी, तसेच हा साठा फेकणाऱ्या जबाबदार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक गोरक्ष गदाडे यांनी केली आहे.
दरम्यान, उघड्यावर अशाप्रकारे मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावण्याच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




