Budget 2025: अर्थसंकल्पाआधी रेल्वे कंपन्यांचे शेअर्स सुसाट, किंमती वाढण्याचे ‘हे’ आहे कारण

Best Railway Stocks: केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम रेल्वे कंपन्यांच्या शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसात मोठी उसळी पाहायला मिळाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी रेल्वेसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
निर्मला सीतारामन या रेल्वेसाठीचे बजेट 15-18 टक्के वाढवू शकतात. म्हणजेच, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.9-3 लाख कोटी रुपयांची तरतूद मिळू शकते. हा पैसा रेल्वेच्या पायाभूत सुविधा, रेल्वेचे आधुनिकीकरण आणि वंदे भारत गाड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी खर्च केला जाऊ शकतो.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने IRCON International, RVNL आणि Railtel Corporation सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यात या शेअर्सच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा यात तेजी दिसून येत आहे. तज्ञ देखील अर्थसंकल्पाआधी यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.
इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्सच्या किंमतीत एकाच दिवसात 15 टक्के वाढ पाहायला मिळाली. तर RVNL चा शेअर्स 10.78 टक्क्यांनी वाढून 412 रुपयांवर पोहोचला. याशिवाय, एकाच दिवसात Railtel Corporation च्या शेअर्समध्ये 9.30 टक्के, आयआरएफसीमध्ये 4 टक्के, टीटागढ रेल सिस्टममध्ये 4.26 टक्के आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये 10.52 टक्के वाढ दिसून आली.
गेल्याकाही वर्षांपासून केंद्र सरकारकडून रेल्वेशी संबंधित पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून रेल्वेसाठी मोठी तरदूत केली जाण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेसाठीची तरतूद वाढवली जाऊ शकते. त्यामुळे सरकारने रेल्वेसाठीची तरतूद वाढवल्यास या शेअर्सच्या किंमतीत आणखी तेजी दिसू शकते.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





