PCMC Parking Policy – वाढलेले शहरीकरण आणि वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ यामुळे शहरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्यासाठी यापूर्वी पार्किंग पॉलिसी राबविण्यात आली होती. मात्र, काही कारणांने या उपक्रमाला ब्रेक लागला. आता पुन्हा नव्याने शहरात पे अँड पार्क पॉलिसी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्थायी समिती आणि वाहतूक व दळणवळण विभागाची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत पार्किंग पॉलिसी तयार करण्याचे निश्चित झाले असून आता वाहन पार्क करण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत. पिंपरी-चिंचवड हे सर्वांत वेगाने वाढणारे शहर म्हणून ओळखले जाते. माहिती तंत्रज्ञान पार्क, ऑटोमोबाईल हब आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या शहरीकरणामुळे शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, त्या प्रमाणात पार्किंगच्या जागा उपलब्ध नसल्याने नागरिक रस्त्यांवरच वाहने उभी करत आहेत. यामुळे मुख्य रस्ते आणि अंतर्गत मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यांनी वाहतूक व दळणवळण विभागाची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत शहरासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक पार्किंग धोरण आखण्याचे निर्देश देण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका. महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने ही पॉलिसी राबविली जाणार आहे. यामुळे केवळ वाहतूक कोंडी सुटणार नाही, तर महापालिकेच्या महसुलातही भर पडणार आहे. ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगचे दर ठरवताना सर्वसामान्यांचा विचार करून आणि धोरणातील त्रुटी दूर करून एक उत्तम पार्किंग पॉलिसी अमंलात येण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाचा आहे. तर, पार्किंग पॉलिसी तयार करताना केवळ प्रशासकीय निर्णय न लादता, शहरातील स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि वाहतूक पोलिसांशी सविस्तर चर्चा करण्यात यावी, अशा सूचनाही सभापतींनी दिल्या आहेत. व्यावसायिक भागातील व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी आणि ग्राहकांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे नियोजन असावे, जेणेकरून व्यापारावर विपरीत परिणाम होणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर हे धोरण राबवले जाईल आणि त्यानंतर संपूर्ण शहरात त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. “स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी पार्किग पॉलिसीसंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील प्रमुख रस्ते, पार्किंगसाठी उपलब्ध जागा आणि वाहनांची घनता याचा सर्व्हे (सर्वेक्षण) केला जाईल. शहराला वाहतूक कोंडीमुक्त करणे आणि पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. नवीन पार्किंग पॉलिसीमुळे पिंपरी-चिंचवडकरांना शिस्तबद्ध पार्किंगची सवय लागेल आणि वाहतुकीला गती मिळेल.” – बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका