Rahul Solapurkar : “हा सोलापूरकर कोण? अश्या लोकांना गाडलं पाहिजे…”; उदयनराजेंचा कडक शब्दात इशारा

Rahul Solapurkar | Udayanraje Bhosale | अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले,” असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला. यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
दरम्यान, अश्यातच आता उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला निषेध नोंदवला आहे. ‘अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना जनतेने दिसले तिथे ठेचून काढलं पाहिजे’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार मांडला. लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. त्यांनी कधी स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही.
वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आपलं कुटुंब मानलं. त्यांनी कधी तत्वाशी तडजोड केली नाही. असं असताना अनेकजण त्यांच्याबद्दल अशी गलिच्छं विधानं करतात. टीव्हीवर ते पाहत असताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्या,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले, “हा सोलापूरकर कोण आहे? अशा लोकांना लाच पलीकडे काही समजत नव्हतं. लावली जीभ टाळ्याला असा हा प्रकार आहे. अशा लोकांच्या जिभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना जनतेने दिसले तिथे ठेचून काढलं पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जाती धर्मात जे तेढ निर्माण होतं ते अशा विकृत लोकांमुळे होतं”.
“मी याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांना भेटणार आहे. अशी विधानं करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जावा अशी मागणी करणार आहे. महाराजांचे विचार जपले नाहीत, तर देशाचे तुकडे होण्यास फार वेळ लागणार नाही.
त्यासाठी ही विकृत विधानं कारणीभूत आहेत. यापुढे यांचे चित्रपट हाणून पाडले पाहिजे. दिग्दर्शक, निर्मात्यांनीही अशा लोकांना थार देता कामा नये. या लोकांना गाडलं पाहिजे. जर गाडलं नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे,” असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा उल्लेख केला होता. याबाबत ते म्हणाले होते की, “त्यावेळी पेटारे-बिटारे काहीच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्रा येथून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे आपल्याकडे आहेत.
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलादेखील लाच दिली होती. महाराजांनी औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र घेतलं होतं. तो परवाना दाखवून महाराज आग्रा येथून बाहेर पडले होते.’ त्यांच्या या वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.





