Rahul Gandhi: ‘राहुल गांधींनी लोकसभेत महाभारत करू नये ही प्रार्थना’; भाजप नेत्यांकडून हल्लाबोल सुरूच

Rahul Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना जे भाषण केले त्यावर सातत्याने प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या गोटातून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू आहे.
त्यातच आता भाजपचे हरियाणातील नेते अनिल विज यांनीही राहुल यांना लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांना आपली एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी लोकसभेत महाभारत करू नये, त्यांना आपल्या संस्कृतीचे काहीच ज्ञान नाही, असे विज यांनी म्हटले आहे.
अनिल विज म्हणाले की लोकसभा लोकशाहीचे सगळ्यांत मोठे मंदिर आहे. लोकांनी मतदान करून आपल्या प्रतिनिधींची निवड केली आहे. त्यामुळे लोकसभेत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी.
काल केलेल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले होते की हजारो वर्षांपूर्वी सहा जणांनी चक्रव्यूह रचून अभिमन्यूची हत्या केली होती. चक्रव्यूहचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे. ते कमळाच्या फुलाच्या आकाराचे असते. त्याच्या आत भय आणि हिंसा असते.
हे सांगत असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री यांच्यासह अन्य चार जणांचे नाव घेतले होते. मात्र त्याला लोकसभा सभापतींनी आक्षेप घेतला होता.
राहुल म्हणाले होते की २१ व्या शतकात आणखी एक चक्रव्यूह रचण्यात आले असून जे अभिमन्यूसोबत झाले तेच भारतासोबत होते आहे. अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवत सहा जणांनी मारले होते, आजही सहा जणांनीच चक्रव्यूह रचला आहे.





