जयशंकर यांना राहुल गांधींचे पत्र; मच्छिमारांच्या सुटकेसाठी हस्तक्षेपाची मागणी

नवी दिल्ली – श्रीलंकन नौदलाने काही दिवसांपूर्वी तामीळनाडूतील ३७ मच्छिमारांना अटक केली. त्यांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याच्या मागणीचे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांना पाठवले आहे.
मच्छिमारांच्या अटकेची आणि त्यांच्या नौका जप्त करण्याची घटना २१ सप्टेंबरला घडली. त्याविषयीची अधिक माहिती मला कॉंग्रेसच्या खासदार आर.सुधा यांनी दिली. अटकेच्या दिवशी संबंधित मच्छिमारांनी समुद्रात संकटात सापडलेल्या श्रीलंकन नौकेला मदत पुरवण्याचा प्रयत्न केला होता.
त्या मच्छिमारांच्या सुटकेसाठी श्रीलंकेशी संपर्क साधण्याची विनंती राहुल यांनी पत्रातून केली. भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेकडून अटक केल्या जाण्याच्या घटना सातत्याने घडतात. त्या घटनांचा केंद्र सरकारच्या स्तरावरून तीव्र निषेध व्हायला हवा, अशी अपेक्षाही राहुल यांनी व्यक्त केली.
तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यावेळी त्यांनीही जयशंकर यांची भेट घेऊन मच्छिमारांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून आमच्या हद्दीत शिरकाव केल्याचा कांगावा करत श्रीलंकन नौदल सातत्याने भारतीय मच्छिमारांना अटक करते.





