Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाला “इंडिया’ (India) आणि “भारत’ (Bharat) यांच्यात वाद निर्माण करायचा होता, म्हणूनच त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे.
सरकारने विशेष अधिवेशन बोलावले तेव्हा महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख नव्हता तोपर्यंत देशाचे नाव बदलण्यावर चर्चा होत होत्या, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
“संविधान सांगते, “इंडिया’ हा भारत आहे, नंतर त्यांना समजले की जनता हा विषय स्वीकारणार नाही. त्यानंतर त्यांनी विशेष अधिवेशन बोलावले होते, या अधिवेशनासाठी त्यांच्याकडे काहीतरी अजेंडा असणे आवश्यक होते.
म्हणून त्यांनी हा महिला आरक्षणाचा विषय मांडला. हा प्रस्ताव राजीव गांधी यांनीच मांडला होता, त्यामुळे आम्ही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. राजीव गांधींनी पंचायत राज व्यवस्थेत महिला आरक्षण आणले होते याची आठवणही राहुल गांधी यांनी करून दिली.
ते म्हणाले की नुसते आरक्षण विधेयक मंजुर करून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी दहा वर्षानंतर कधी तरी होईल, पण त्यातही त्यांनी ओबीसींसांठी आरक्षणाची तरतूद केलेली नाही. पण आता आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही त्याची त्वरीत अंमलबजावणी करू असे ते म्हणाले.
जात जनगणनेचा विषय टाळल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारची खिल्ली उडवली ते म्हणाले की, संसदेतील माझ्या भाषणापूर्वी मी काही संशोधन केले. मला असे आढळून आले की, पंतप्रधानांसह त्यांचे 90 अधिकारी देश चालवत आहेत.
त्यांच्यामध्ये केवळ तीन ओबीसी नेते आहेत. आणि त्यांनाही काही अधिकार नाही. पंतप्रधान जातीच्या जनगणनेला का घाबरतात? असा सवाल त्यांनी केला.
राजस्थानातील कॉंग्रेस सरकारच्या कार्याचा कौतुक करून ते म्हणाले की, राजस्थानमध्ये आम्ही 3,600 इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या, आम्ही आरोग्य सेवा पुरवली. आम्ही घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना दिले असे ते म्हणाले.
आता कॅमेरेही बंद करतात !
संसदेत “इंडिया’ आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. राज्यसभेत हे विधेयक एकमताने मंजूर झाले आहे. राहुल बोलताना पुढे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी, मी अदानी प्रकरणावर संसदेत भाषण दिले होते. पू
र्वी ते आमचे माइक बंद करायचे, पण आता त्यांनी कॅमेरेही बंद करायला सुरुवात केली आहे. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले. भाजपच्या कार्यकर्त्यासमोर फक्त “अदानी’चा उल्लेख करा, तो पळून जाईल. त्यांना विचारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानीजींचे नाते काय? आणि ते पळून जातील.’





