कर्नाटक निकालावर राहुल गांधी म्हणतात, ‘नफरत का बाजार बंद, मोहब्बतकी दुकाने शुरू…’

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचे कौतुक करताना दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की नफरत का बाजार बंद हो गया है और मोहब्बतकी दुकाने शुर हो गयी है.
आज या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही कर्नाटकच्या जनतेला जी आश्वासने दिली होती आणि ज्या पाच हमी दिल्या होत्या त्या विषयी आमच्या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल. त्यांनी या निकालाविषयी कर्नाटकातील जनतेचे, कार्यकर्त्यांचे अभिनंदन करीत त्यांचे आभारही मानले आहेत.
ते म्हणाले की आम्ही द्वेष, वाईट भाषा न वापरता कर्नाटकची निवडणूक लढवली याचा मला आनंद आहे. आम्ही प्रेमाने निवडणूक लढवली. कर्नाटकात नफरत का बाजार (द्वेषाचा बाजार) बंद झाला आहे, मोहब्बत की दुकाने (प्रेमाची दुकाने) सुरू झाली आहेत.
कर्नाटकच्या निवडणुकीत एका बाजूला क्रोनी भांडवलदारांची ताकद होती तर दुसरीकडे गरीब लोकांची ताकद होती, असे गांधी म्हणाले. गरिबांच्या ताकदीने क्रोनी भांडवलदारांच्या शक्तीचा पराभव केला आहे आणि हे सर्व राज्यांमध्ये होईल, असे ते म्हणाले.





