राहुल गांधी पूरग्रस्त मराठवाडा दौऱ्यावर; साडी नेसवलेल्या ‘त्या’ व्यक्तींचाही सन्मान करणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मराठवाडा भागात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. अतिवृष्टीमुळे आठहून अधिक जीव गेले, गावे पाण्यात बुडाली, सुमारे ३०,००० हेक्टर शेती नष्ट झाली आणि शेतजमिनीची सुपीक मातीही वाहून गेली. या संकटकाळात काँग्रेस नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता आहे.
दसऱ्यापूर्वीच पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्याची योजना असून, या दौऱ्यात कल्याणमधील ‘साडी अपमान’ प्रकरणातील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते मामा पगारे यांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे.
राहुल गांधींचा मराठवाडा दौरा
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात पोहोचणार आहेत, अशी माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. एक्सवर पोस्ट करत राहुल गांधींनी महायुती सरकारला तातडीने मदत कार्य वेगवान करण्याचे आवाहन केले आहे. “मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची बातमी हृदयद्रावक आहे. सरकारने पीडितांना तात्काळ मदत पुरवावी, शेती नुकसानाची तपासणी करून पूर्ण भरपाई द्यावी. काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असं ते म्हणाले.
याशिवाय, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणीही त्यांनी केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून, केंद्राकडे अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीची मागणी करणार आहेत. राज्य सरकारने जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या नुकसानीसाठी १,३३९ कोटी रुपयांचा मदतपॅकेज जाहीर केला असला, तरी विरोधकांकडून याला अपुरे म्हटले जात आहे.
काय आहे ‘साडी अपमान’ प्रकरण
कल्याण-डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश ‘मामा’ पगारे (७२) यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी भररस्त्यात गाठून साडी नेसवून अपमानित केल्याचा गंभीर प्रकार घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एक आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्याने हा ‘प्रतिशोध’ घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पगारे यांची तब्येत बिघडली आणि ते रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणाने काँग्रेस-भाजपमध्ये तणाव वाढला असून, टिळकनगर पोलिसांनी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपाध्यक्ष संदीप माळी, दत्ता मयेकरसह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेवर राहुल गांधींनी तात्काळ प्रतिक्रिया देत रुग्णालयात असतानाच पगारे यांच्याशी फोनवर संवाद साधला. “मामा, घाबरू नका. काँग्रेस तुमच्यासोबत आहे. ५० वर्षांपासून तुम्ही पक्षासाठी समर्पित आहात. बाळासाहेब थोराट यांनी तुमची माहिती दिली. लवकरच भेट घेईन,” असं धीर देऊन त्यांनी मराठवाडा दौऱ्यात पगारे यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले, “ॲट्रॉसिटी दाखल न झाल्याने कोर्टात दाद मागणार.” काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुर्गा मंदिरात प्रतीकात्मक निदर्शनेही केली.





